ऋतू हिरवा

            पावसाळा सुरु झाला रे झाला की त्याबरोबर काही गोष्टी हमखास येतात. जसे छत्र्या-रेनकोट, वाफाळता चहा आणि गरमागरम भजी, पावसाळी सहली, रस्त्यावरचे खड्डे आणि कपड्यांवर उडणारा चिखल, चुकणारी बस किंवा ट्रेन आणि होणारा उशीर, इत्यादी. पण अजूनही एक गोष्ट घडते पावसाळ्यात ती म्हणजे एफएम वर लागणारी पावसाची गाणी आणि मग आपोआप मनात दाटणाऱ्या पावसाळी कविता. ना. धो. महानोरांच्या शब्दांत सांगायचे झाले तर "मन चिंब पावसाळी". लतादीदींनी गायलेले ऋतू हिरवा (गीत- शांता शेळके) आणि पद्मजा फेणाणी जोगळेकरांनी स्वरसाज चढवलेले सुंदर साजिरा श्रावण आला (गीत- कुसुमाग्रज) हि दोन्ही गाणी तर सर्वात पहिले हजेरी लावतात. मागून येते ती सौमित्र यांच्या गारवा अल्बम मधली सर्व गाण्यांची रांग आणि मग पुढे प्रेमगीतांची संततधार सुरु होते अगदी पावसासारखीच. पाऊस कोणतीही भावना सोडत नाही; प्रेम, शृंगार, विरह, दुःख, आनंद सर्व काही घेऊन स्पृहा जोशी म्हणते तसे हवं तेव्हा हवं तसं आपल्यासाठीच भरून येतो. ए आई मला पावसात जाऊदे, पीर पीर पीर पीर पावसाची, ये रे ये रे पावसा  ते अगदी अग्गोबाई ढग्गोबाई पर्यंत सर्व गाणी बालपणीचे दिन सुखाचे हे पुन्हा जाणवून देतात. एवढं लिहूनही पावसाबद्दल आणि पावसाळ्यात जाणवणाऱ्या भावनांबद्दल लिहायचे कोणी थांबत नाही हे मात्र नक्की. पावसाच्या पहिल्या धारांमध्ये माझ्यासारख्या नवकवयित्रीला (खरेतर पावसाळी मोसमापुरतीची कवयित्री) तर हमखास काहीतरी सुचतंच. पहिला पाऊस आणि पावसाच्या कविता-गाणी हे समीकरण कधी बदलणारे नाही कारण पावसाची नुसती चाहूल मनावर जो भावनांचा वर्षाव करून जाते त्यात कवितेचे बीज आपोआप रुजते. शेवटी काय तर, कविता समजायच्याच नसतात, समजायच्या असतात त्या भावना, बरोबर ना? 

Comments

  1. खूपच सुंदर लिल्ह आहे. हे सगळी गाणी परत लक्ष्यात करून दिल्या बद्दल मना पासून आभार.

    ReplyDelete
  2. Bhari 🔥🔥
    अर्ज किया है
    पहिला पाऊस पहिले प्रेम पहिल्या पावसाचा पहिला थेंब....

    ReplyDelete
  3. पावसाचे तेच रूप...पण खूपच छान शब्दात नव्याने व मोजक्याच शब्दात मांडले आहे... 👍👍👌👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment