कृष्ण
कृष्णा, तू पण काय अजीब रसायन आहेस रे! तुला नंदलाल म्हणावे तर मुसळधार पावसात दुथडी भरून वाहणारी नदी पार करणारा वसुदेव आठवतो आणि देवकीनंदन म्हणावे तर यशोदेच्या ममतेला कमी लेखल्यासारखे वाटते. रुक्मिणीला स्वयंवरातून पळवून नेणारी आणि अर्जुनाला गीतोपदेश करणारी व्यक्ती एकच होती याचेही आश्चर्य वाटते. माझ्यातल्या स्त्रीत्वाची चाहूल लागल्यावर राधेचा श्याम म्हणून समजून आलास आणि अजून थोडे कळायला लागले तेव्हा मीरेचा श्याम म्हणून उमजायला लागलास. सर्वप्रकारच्या उत्कट समर्पणातून तुझ्याच खुणा दिसतात. कधी वाटते सर्वस्व सोडून तुझ्यात विलीन व्हावे पण नक्की काय करायचे तेच कळत नाही. मीरेप्रमाणे भक्तीमार्गात तल्लीन व्हायचे का तूच अर्जुनाला सांगितलेल्या कर्मयोगानुसार काम आणि कर्तव्यात झोकून द्यायचे? राधा बनूनसुद्धा ही उत्कटता साध्य होते का? काही कळत नाही! या प्रश्नउत्तरांच्या, कळण्या-नकळण्याच्या पलीकडे कुठेतरी आहेस तू. जिथे मानवी बुद्धी आणि मनाच्या मर्यादा संपतात तिथूनच तुझा अथांग, अनाम प्रांत सुरु होतो. त्या शांत निळाईत मिसळून जायचे आहे मला पण कसे ते माहित नाही. तेव्हा तूच भेट ना इथे येऊन. जाणवू देत तुझ्या अस्तित्वाच्या खुणा बालकांच्या हास्यातून, लयतालातून, काव्यातून, ऋतुचक्रातून, गणित-विज्ञानाच्या प्रमेयातून, प्रत्येक नात्यातून, आपुलकीच्या ऋणानुबंधांतून सभोवतालच्या सर्वच उत्तम, उदात्त आणि उन्नत गोष्टींतून भले त्या कितीही लहान का असेनात. आयुष्याला मी आणि माझे या पलीकडे जाऊन बघण्याची सतत प्रेरणा देत रहा आणि आयुष्याच्या संध्याकाळी डोळे मिटताना जीवन जगल्याचे समाधान असू देत. हे समाधान म्हणजेच तू, बरोबर ना?
छान
ReplyDeleteउल्लेखनीय!!!
ReplyDeleteअतिशय आशयघन अर्थ व तितकीच सुंदर शब्दरचना...👏👏👍👍👌👌👌
ReplyDelete