आषाढस्य प्रथम दिवसे⎸
आषाढ प्रतिपदा आणि त्यानिमित्ताने हमखास आठवणारी ही कवी कालिदासाच्या मेघदूत या काव्याची पहिली ओळ. यक्षाने काही अपराध केल्याने त्याला कुबेराने अलकानगरी सोडून देवगिरी पर्वावर एक वर्ष राहण्याची शिक्षा फर्मावली असते. आषाढाच्या पहिल्या मेघाला आकाशात बघताच पत्निविरहात असलेल्या यक्षाला वाटते की आपल्या प्रिय पत्नीला हा मेघ आपला निरोप पोहोचवेल. मग काय देवगिरीपासून हिमालय ओलांडून अलकानगरीत कसे जायचे आणि वाटेत काय काय खुणा आहेत याचे विस्तृत वर्णन तो सुरु करतो. वाटेतील नद्या, पर्वत, नगरी, पावसाची आतुरतेने वाट पाहणारी लोक इत्यादी इत्यादी. त्यापुढे अलकानगरी आणि त्यातले यक्षाचे घर, तिथला परिसर, त्याची पत्नी, तिची दिनचर्या यासर्वांचेही वर्णन यक्ष करतो. म्हणजे कुठे जायचे, कसे जायचे, कधी जायचे, कोणाला भेटायचे आणि काय निरोप द्यायचा याची सर्व इत्यंभूत माहिती देतो. मोठे लोक बोलत नाहीत तर करून दाखवतात या न्यायाने यक्ष मेघाकडून कसल्याही उत्तराची अपेक्षा करत नाही. उलट मेघालाच सदिच्छा देतो की त्याची आणि त्याच्या प्रियेची म्हणजेच विद्युल्लतेची कधीच ताटातूट होऊ नये. मेघदूताचे खरे सौंदर्य त्या सर्व रसभरीत वर्णनात आहे. पण माझ्यासारख्या आगाऊ वाचकाला हा प्रश्न पडतोच "शेवटी निरोप पोहोचला का?"
संदेशवहनाची माध्यमे बदलली (शिकवलेले पक्षी, निरोप्या, नंतर आलेली टपालसेवा) तरी आपला निरोप पोहोचला का हा प्रश्न कायम होता. आत्ता डिजिटल माध्यमे आपला संदेश पोहोचला आहे याची खात्री देतात आणि समोरच्याने तो वाचला किंवा नाही हे पण समजते. पण सततच्या संवादात आपल्याला जे सांगायचे आहे ते नक्की समोरच्यापर्यंत पोहोचले असेलच याची काही खात्री नाही. किंवा समोरच्याचे मत आपल्याला पूर्णपणे समजेलच असेही नाही. पत्र लिहिणे हे विचारांती व्हायचे तसेच त्याचे वाचन पण. आत्ता सततच्या मेसेजेस च्या भडिमाराने संदेशवहनातील अनिश्चितता तर संपवली आहे पण भावना नक्की पोहोचतात का ह्याची खात्री मिळणे कठीण आहे. आता यात ऐकणाऱ्याने जास्त समजूतदार व्हायला हवे हे अगदी खरे आहे पण सांगणाऱ्याने पण आपली भाषा बदलून पाहायला काय हरकत आहे? शेवटी काय निरोप व्यवस्थित पोहोचायला हवा, हो ना?
छान
ReplyDeleteखरंय...या आधुनिक सोईसुविधांमध्ये नकळत भावना कुठेतरी हरवल्या गेल्या आहेत, असे सतत जाणवत रहाते...
ReplyDelete