चवीपुरते......
मला जर कोणी विचारले की मला अजिबात न समजलेली एखादी संकल्पना कोणती तर मी उत्तर देईन "चवीपुरते मीठ". कोणत्याही स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला विचारले की मीठ किती घालायचे तर त्यांचे एकच उत्तर ठरलेले असते - चवीपुरते. अरे पण नक्की किती? या प्रतिप्रश्नावर हमखास "अंदाजे घाल ना" हे उत्तर मिळते. त्यामुळे कोणताही पदार्थ केला तर तो व्यवस्थित (हो व्यवस्थित, उत्तम म्हणतच नाही मी) होईल किंवा नाही याची अनिश्चितता कायम असते. कधी कधी वाटते की ह्या मिठाचा खारटपणा नीट मोजून त्याची नोंद असायला हवी. म्हणजे किती चमचे मीठ किती खारटपणा देईल याचे अचूक निदान करता येईल त्याचबरोबर पदार्थ कसा होईल यातली अनिश्चितता कायमची संपेल. म्हणजे एकाच व्यक्तीने केलेला तोच पदार्थ दरवेळेला वेगवेगळा लागतो, असा प्रकार होणार नाही आणि माझ्यासारख्या नवशिक्यांना सुटकेचा निश्वास सोडता येईल. खरेच ही अनिश्चितता किती त्रासदायक असते ना! जीवनाच्या सर्वच क्षेत्रात अनिश्चितता थोड्याफार फरकाने असतेच. त्यातून सुरु होते शाश्वतीसाठीची धडपड आणि स्पर्धा. चिंता आणि काळजी यांचा उगमही तिच्यातूनच होतो. यासर्वांपायी आपण आपल्या जवळच्यांना आणि स्वतःलाही खूप त्रास करून घेतो. अनिश्चितता नसेल किंवा कमी असेल तर प्रयत्न करण्याची उमेद आणि वाईटातही चांगले घडेल ही आशा मावळून जाते. अनिश्चितता ही अगदी मिठासारखी आहे आणि आत्तापर्यंत कोणालाही तिचा खारटपणा मोजून ती किती असावी याचे अचूक निदान करणे शक्य झालेले नाही. जास्त झाले तर जेवण खारट आणि कमी झाले तर अळणी. पण रोज प्रत्येक घरातून, खानावळीतून, मोठमोठ्या हॉटेल्स मधून अगणित पदार्थ बनतात चवीपुरते मीठ घेऊन. कसे जमते हे? रोजच्या सरावाने थोडे थोडे चुकत-माकत यायला लागतो मीठाचा अंदाज. शेवटी का प्रयत्नांती परमेश्वर हेच खरे. सध्याच्या या जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणाला सामोरे जाताना हळूहळू का होईना आपल्या सर्वांना चवीपुरते मीठ समजून येईल हे नक्की. तोपर्यंत प्रयत्न चालू राहू देत. :)
This comment has been removed by the author.
ReplyDeleteDamn it man!!! So true..... "Beauty lies in the feeling of uncertainty. Worries too lie in the feeling of uncertainty. Choose." Hence the choice is important and makes the difference in life. 🙏🏻✨💙
ReplyDeleteyes, choice plays a significant role :)
Delete