सीमोल्लंघन
दसरा अर्थात विजयादशमी. पांडवांनी अज्ञातवास संपवून पुन्हा हातात शस्त्रे घेतल्याचा दिवस, देवीने वेस ओलांडून महिषासुराला मारल्याचा तसेच रामाने रावणावर विजय मिळवल्याचा दिवस. कला, साहित्य शिक्षण क्षेत्रातील उपासकांना आपल्या गुरूंचे कृतज्ञतेने स्मरण करण्याचा आणि त्यांच्या आशीर्वादाने नवनवीन क्षितिजांकडे वाटचाल सुरु करण्याचा शुभदिन.
काही नवीन करायचे म्हटले की आपण बऱ्याचदा हे शक्य नाही अशी बंधने स्वतःवर घालून घेतो. आपली क्षमता नाही आणि आपल्याला जमणार नाही असे म्हणून कितीतरी गोष्टी सुरु करण्यापूर्वीच माघार घेऊन टाकतो. मूळच्या समजुती आणि विचारांमधून बाहेर येऊन वेगळे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करणे हे देखील एक प्रकारचे सीमोल्लंघनच आहे. "उच्च विचार सर्व दिशांनी माझ्याकडे येऊ देत" ह्या ऋग्वेदातील उक्तीप्रमाणे स्वतःच्या गुणांना अधिकाधिक चांगले बनवणे आणि अवगुणांवर विजय मिळवणे ही आजच्या काळातील खरी विजयादशमी! व्यक्तीगत आयुष्यात आणि सामाजिक पातळीवर देखील उन्नती करण्याची प्रेरणा यानिमित्ताने नक्कीच मिळते नाही का? जुन्याकडून अधिक उत्तम अश्या नव्याकडे जाणारे हे सीमोल्लंघन आपल्या सर्वांना आयुष्यात प्रगतीच्या दिशेने घेऊन जाईल यात शंकाच नाही.
Comments
Post a Comment