स्वांंतःसुखाय
मी खूप पूर्वीपासून व्यक्त होण्यासाठी लेखन आणि नृत्याचा आधार घेत आले आहे. तेव्हा माझे व्यक्त होणे इतरांपर्यंत पोहोचले पाहिजे असे कधी वाटले नाही. माझ्यासाठी लिहिलेले माझे विचार किंवा अनुभव इतकेच त्याचे स्वरूप होते. मी इतरांसमोर पूर्णपणे व्यक्त होत नाही आणि कोणीच माझ्या मनातील गोष्टी समजून घेत नाही अशी तक्रार करत राहते हे जेव्हा मला जाणवले तेव्हा मग माझे लेखन आणि विचार सर्वांसमोर न मांडण्याची माझी चूक लक्षात आली. माझे लेखन जवळच्यांना जसजसे आवडत गेले तसे त्यातून मिळालेल्या उत्साहाने हा ब्लॉग लिहिण्याचा घाट घातला. मग काय आतापर्यंत एका वहीपुरते मर्यादित असलेले विचार एका झटक्यात सर्व जगासमोर खुले झाले.
मग सर्वांचे अभिप्राय आणि सूचनांचा स्वीकार करता करता शेवटी मी माझे लेखन लोकांना आवडेल किंवा नाही याचा नकळत जास्त विचार करायला लागले. अर्थात कौतुक हे माणसाला हवेच असते आणि मीदेखील काही अपवाद नाही. पण यासर्व गोंधळात लिहिण्याचा मूळ उद्देश काय असावा हेच कळेनासे झाले. वाचकांना रुचेल असे लेखन हवे कारण लेखन जेव्हा प्रकाशित केले जाते तेव्हा ते फक्त लेखकापुरते मर्यादित राहत नाही, तो एक संवाद देखील असतो. मग मला पटेल ते आणि आवडेल ते लिहीत सुटणे ही मनमानी होईल.
बऱ्याच विचारांती मला एक गोष्ट पटली- साहित्य आणि कला यांचा उद्देश माणसाला आधीपेक्षा एक पातळी वर नेऊन ठेवणे हा असावा. थोडक्यात कला साहित्य आणि विचारांचे आदानप्रदान हे सादरकर्ता आणि आस्वादक या दोहोंच्या भावनिक, सामाजिक, वैचारिक, अध्यात्मिक उन्नतीचा प्रयास होय. असे असताना "ही उगाच इतरांना अक्कल शिकवते" किंवा "मी कशी चांगली ते बघा असे दाखवत फिरते" अश्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटण्याची पण शक्यता आहेच. स्वतःचे कौतुक किंवा इतरांना उपदेश यापैकी काहीही करण्याचा हेतू नसला तरी आपण कुठे चुकत नाही ना अशी शंकेची पाल चुकचुकतेच. माझ्याकडून चुका झाल्याही असतील आणि भविष्यात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मग काय करायचे? आणि मुळात उत्तमतेची व्याख्या ठरवणारी आणि इतरांनी काय करायचे हे सांगणारी मी कोण? कदाचित मला योग्य वाटणाऱ्या गोष्टी इतर कुणाला तितक्या योग्य वाटणारही नाहीत.
विचारांती मी पुढील निष्कर्ष काढला आहे- एक व्यक्ती म्हणून अधिकाधिक चांगले व्हायला मदत करेल असे विचार, अनुभव, कल्पना मी माझ्या लेखणीतून वाचकांना रुचेल अशा प्रकारे इथे मांडायचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे जेणेकरून या सर्व खटाटोपांती मला आनंद मिळेल. थोडक्यात हा ब्लॉग स्वान्तःसुखाय आहे!
This comment has been removed by the author.
ReplyDeleteअग मनसोक्तपणे लिहीत रहा! तुझ लिखाण आम्हाला आवडतच! आणि खरी गंमत काय आहे माहिती? अगदी मनापासुन लिहल ना, तर ते काही न काही स्वरूपात थेट मनापर्यंत पोहोचतच!!
DeleteIndeed! I always feel that writing for yourself is also needed. How long can you keep writing to impress others. Just keep enjoying what you write, not everybody will like everything. Also reminds me, bahut time se maine kuch nahi likha hai😅
ReplyDelete