बदल
मकर संक्रांत आली की तिळगुळासोबत अजून एक गोष्ट आठवते - हळदीकुंकू. आईचे हळदीकुंकू ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत आणि ट्रेनमध्ये रोज एकत्र प्रवास करणाऱ्या मैत्रिणींसोबत होते त्यामुळे आमच्या घरी कुणी हळदीकुंकवाला येत नाही. पण माझ्या आजोळी तसे नाही, मामीच्या मैत्रिणी आणि शेजारी असे सर्व घरी जमतात. यंदा मला आजोळी हळदीकुंकू बघायचा योग आला. कार्यक्रम नेहेमीसारखाच पार पडला पण एक गोष्ट मला जाणवली ती म्हणजे हळदीकुंकवाची बदलेली वेळ. माझ्या लहानपणी आजी मला सर्व बायकांना आमंत्रण द्यायला पाठवायची. तेव्हा साधारण पाच-साडेपाच पर्यंत आमच्याकडे हळदीकुंकवाला या असे सांगितल्याचे मला आठवते. साडे सहापर्यंत सर्व जणी घरी जाऊन स्वयंपाकाला लागायच्या सुद्धा. मामीने मात्र सर्वांना साधारण सात-साडेसात वाजताचे आमंत्रण दिले होते. तिच्या काही मैत्रिणी सर्व स्वयंपाक आवरून आल्या तर काही नाही. अर्थात साडेसातला आल्यामुळे त्यांना निघेपर्यंत सव्वाआठ- साडेआठ झाले. पण कुणीही घरी लवकर जाण्याच्या गडबडीत नव्हते.
हा तसे बघितले तर छोटासा फरक पण 'सातच्या आत घरात' हा नियम आता सुनांनाही लागू होत नाही (निदान शहरी भागात तरी) हे यातून अगदी स्पष्ट दिसत होते. तसेच सर्व स्वयंपाक अमुक वेळी व्हायलाच हवा आणि तो करणारे घरात दुसरे कुणी नाही असा प्रकार पण कमी होत असल्याचे आपण सांगू शकतो. ज्या मैत्रिणीने स्वयंपाक केला होता तिने पटकन कुकरमध्ये फक्त पुलाव केला होता. म्हणजे साग्रसंगीत स्वयंपाकातून अधूनमधून मोकळीक मिळते आणि त्याचा कुणी फारसा बाऊ करत नाही हेदेखील दिसून आले. यासर्वजणींचे वर्णन करायचे झाले तर पुढीलप्रमाणे करता येईल - साधारण ३०-३५ वयोगटातील, नोकरी न करणाऱ्या, चाळीत राहणाऱ्या, मध्यमवर्गीय स्त्रिया ज्यांची मुले साधारण ५-१० वर्षे वयाची आहेत. त्यांची पार्श्वभूमी लक्षात घेता घरी जायच्या वेळेत झालेला हा बदल नक्कीच उल्लेखनीय व महत्वाचा आहे.
या घटनेतून समाज बदलतो आणि त्याचे पुरावे हे अश्या छोट्या गोष्टींमधूनही मिळतात हे मला नव्याने जाणवले. स्त्री-पुरुष समानता चळवळीमुळे मध्यमवर्गीय स्त्रियांच्या स्वातंत्र्यात गेल्या १५ वर्षात लक्षात येण्याजोगा फरक झाला आहे. खरेतर बदल हा टाळता येत नाही, काळाप्रमाणे बदलावे लागतेच पण तरीदेखील समाज बदलांना विरोध करतो. लोकांना बदल करण्यात धोका वाटतो पण आहे तसेच राहण्यात धोका वाटत नाही हे एक मोठे आश्चर्य आहे. बदलात समाजघडी विस्कटण्याचा किंवा नुकसान होण्याचा धोका अल्प प्रमाणात असू शकतो पण बदल न करताच अजून चांगली पातळी कशी गाठता येईल? आणि नवीन बदलांमुळे काही गडबड झालीच तर ती सुधारण्यासाठी बदल हा करावाच लागेल ना? ते म्हणतात ना, बदलात धोका आहे पण बदल न करणे त्याहून अधिक धोक्याचे आहे. ज्यांना अधिकाधिक चांगल्या आयुष्याची तसेच चांगल्या समाजरचनेची आस आहे त्यांनी बदलाची जोखीम पत्करायला हवी. या प्रयत्नात पूर्णपणे यश जरी नाही आले तरी हळूहळू ते बदल समाजात झिरपत नक्कीच जातात आणि बदल घडवू पाहणाऱ्यांना आयुष्यभरासाठी समृद्ध अनुभवांची शिदोरी देऊन जातात हे नक्की!
Comments
Post a Comment