Social Media Diet


    आजकाल काहीही माहिती घ्यायची असेल तर लोकांना विचारणे सोडून आपण पहिले Google ला विचारतो. अगदी चांगला मोबाईल कोणता ते अमुक एका शब्दाचा अर्थ काय किंवा एखादा पदार्थ कसा बनवायचा पासून ते सध्या जगात काय होत आहे पर्यंत सर्वच गोष्टी इंटरनेटवर आहेत. पण यात एक मेख आहे. माहितीचे आदानप्रदान हे एका चाळणीतून होत असते जिची मुळे ही अधिकाधिक नफा मिळवण्यात आहेत. त्यामुळे आपल्याला नक्की कोणती माहिती हवी आहे यापेक्षा गुगलला आपल्याला काय दाखवायचे आहे हेच आपण बघत असतो नाही का? इंटरनेट मुळे जवळजवळ प्रत्येकालाच आपला आवाज, मते, कला जगासमोर मांडायचे व्यासपीठ मिळाले पण बहुतांश लोक इथे दररोज कोणत्या माहितीची भर घालत आहेत? खासकरून जे सोशल मीडिया सेलिब्रेटी आहेत ते तर वाटेल ते पोस्ट करून भरमसाठ लाईक्स मिळवत असतात. आपली वैयक्तिक माहिती जगजाहीर करणे याला कला किंवा अभिव्यक्ती म्हणायचे का?
     

    अजून एक मोठा प्रश्न असा की समाजासाठी किंवा सामान्य माणसांसाठी नक्की गरजेची माहिती कोणती? शेवटच्या माणसाच्या गरजा नक्की काय आहेत? त्यांबद्दलची माहिती उपलब्ध आहे का? उदाहरणार्थ भारतासारख्या शेतीप्रधान देशात शेतीसंदर्भात माहिती देणारे YouTube किंवा Insta सेलिब्रेटी किती आहेत? सामान्य शेतकऱ्याला कोणते प्रश्न पडतात याबाबत काही माहिती आहे आहे का? गावातल्या मुलांना किंवा आदिवासी पाड्यात त्यांच्या बोलीभाषेत समजेल आणि त्यांच्या अनुभवविश्वाशी साधर्म्य साधेल अशा प्रकारे विज्ञान समजावून देणारे तरी कुठे आहेत? ऑनलाईन शिक्षणाने खालच्या ८० टक्के लोकांचा किती विचार केला आहे. मुळात ऑनलाईन शिक्षण (अपवाद वगळता) मोफत नाही, सर्वसमावेशक तर नाहीच नाही आणि याहून गंभीर बाब म्हणजे एक मोठी बाजारपेठ म्हणूनच याकडे पहिले जाते शिक्षण किंवा सेवा या अर्थाने नाही.
     

    वरील सर्व उदाहरणांत आणि एकंदरीतच इंटरनेटच्या वापरात मागणी तसा पुरवठा हा एक समान धागा राहतो. पण हे इथेच थांबत नाही, पुढे जाऊन त्या पुरवठ्याची चटक लावणे याकडे देखील पुरेपूर लक्ष दिले जाते जेणेकरून माहितीवर अवलंबून असलेला व्यापार सुरक्षित राहील. अर्थात इतरांची विशेषकरून नफ्याच्या गणितात अंध झालेल्या कंपन्यांची नैतिकता तर सुधारता येऊ शकत नाही. पण आपण एक व्यक्ती म्हणून किंवा एक उपभोक्ता म्हणून काय काय आपल्या डोक्यात घालतो आणि त्याचे आपल्या मनःस्वास्थ्यावर काय परिणाम होतात याचा विचार करणे आवश्यक आहे. आताच मानसिक अस्वास्थ्य दूर करण्यासाठी इंटरनेट खासकरून सोशल मीडियाचा गरजेपुरता किंवा कमीतकमी वापर यावर भर दिला जातोय. कोण जाणे भविष्यात जाऊन तुम्हाआम्हाला खाण्याच्या डाएट प्लॅन सारखं सोशल मीडिया डाएटवर रहावे लागेल. म्हणजे किती वेळ कोणती वेबसाईट बघावी किंवा शांत झोपेसाठी काय पहावे/ पाहू नये इत्यादी गोष्टींचे तज्ज्ञाने नेमून दिलेले एक वेळापत्रक पाळावे लागेल. सध्याची परिस्थिती बघता मला खात्री आहे की अशी वेळ नक्कीच येईल आणि इतकंच नाही तर योग्य सोशल मीडिया डाएट कसे असावे हे सुद्धा आपण google लाच विचारू!


Comments

  1. Digital detox सारख्या संकल्पणांमधून अशा प्लॅन्स ची नांदी होऊ घातली आहे हे निश्चित !

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts